पुणे : अर्थमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी काही केले नाही. सरकारची ही घोषणा हवेतच विरली आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांनी पुण्याच्या विकासासाठी ठोस असे प्रकल्प देणे अपेक्षित होते. हा निराशाजनक अर्थसंकल्प आहे, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली.
रिंगरोडसाठी भूसंपादन, एकात्मिक वाहतुकीसाठी खास निधी या बाबी पालकमंत्र्यांनी अर्थसंकल्पात समाविष्ट करायला हव्या होत्या. शहर व जिल्ह्यासाठी नवीन धरणाचा प्रस्ताव अजित पवार यांच्याकडून अपेक्षित होता. त्यादृष्टीने हा निराशाजनक अर्थसंकल्प आहे. पेट्रोलवरील करात वाढ केल्याने महागाई वाढेल. सर्वसामान्यांचे हाल होतील.
रोजगार व गुंतवणुकीला चालना देणाऱ्या योजना नाहीत. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी घोर निराशा केली आहे. वित्तीय तूट कमी करण्यासाठी कोणताच प्रयत्न नाही. आरोग्य व शिक्षण याबाबत सरकार गंभीर नाही. असे बजेटवर दृष्टिक्षेप टाकल्यावर जाणवते. जनतेची दिशाभूल करणारा फसवा अर्थसंकल्प, असे बापट म्हणाले.

