ESIC चे 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करुन उर्वरित 300 खाटांचे आणि हॉस्पिटलशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याची खासदार बापट यांची लोकसभेत कलम ३७७ अंतर्गत मागणी.
नवी दिल्ली, ता. ३० : केंद्रीय कामगार मंत्रालयामार्फत चालवले जाणारे कर्मचारी राज्य विमा रुग्णालय, बिबवेवाडी, पुणे, येथे कमी उत्पन्न असलेल्या कामगारांच्या आरोग्य फायद्यांसाठी कार्यरत असलेले 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करुन उर्वरित 300 खाटांचे आणि हॉस्पिटलशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याची मागणी खासदार बापट यांची लोकसभेत कलम ३७७ अंतर्गत मुद्दा मांडला.
यावेळी बापट यांनी सांगितले की हे रुग्णालय 16.5 एकर परिसरात आहे. जिथे पन्नास खाटांच्या ओपीडी विभागाची सुविधा उपलब्ध होती. या रुग्णालयाच्या विस्ताराची नितांत गरज आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) केंद्रीय कार्यालयाकडे वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी आणि उपलब्ध जागेत ओपीडीसह आयपीडी सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. दिनांक 16.10.2018 रोजी उपरोक्त प्रस्तावाला ESIC ने मंजूरी दिली आणि पहिल्या टप्प्यातील 200 खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करण्याची आणि उर्वरित 300 खाटांचे आणि हॉस्पिटलशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याची नितांत गरज असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांचे व केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
सदर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास पुण्यासह इतर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

