पुणे-विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणे जलपर्णी झाली आहे. या वाढलेल्या जलपर्णीमुळे आनंदनगर तसेच नदीकाठच्या सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना डासांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही जलपर्णी तातडीने काढावी तसेच डासांपासून मुक्ततेसाठी औषध फवारणीचा वेग वाढवावा, अशी मागणी माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केली आहे.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजीव मोहोळ आणि उप अभियंता प्रदीप आव्हाड यांची भेट घेऊन नागपुरे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. नदीतील जलपर्णीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत वारंवार विनंती करून देखील प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली. नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे. यामुळे विठ्ठलवाडी, आंनदनगर परिसरातील नागरिकांना मच्छरांचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेकडून आवश्यक ती औषध फवारणी देखील वेळेवर होत नाही. औषध फवारणीचा वेगही अत्यंत कमी आहे. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याची तत्काळ दाखल घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी नागपुरे यांनी केली आहे.
जलपर्णी काढली जात नसल्याने डासांची समस्या भेडसावत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक आम्हालाच फोन करून जाब विचारतात. प्रशासनाचा ढिम्म कारभार असाच सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- मंजुषा नागपुरे, माजी नगरसेविका

