मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शेतकरी आंदोलनाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. ‘सरकारने निर्णय मागे घेतला तर आपण दहा वर्षे मागे जाऊ’ असे मत अनिल शिदोरे यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले अनिल शिदोरे?
आपण वर्षानुवर्ष पाहिले की कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करते आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता इथून सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल.. सरकारने माघार घेऊ नये, अशी मागणी शिदोरे यांनी केली आहे.तसेच, ‘शेतीचं भलं खुल्या बाजाराशी जोडले जाण्यात आहे. ती दिशा आहे. ज्या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे, ते कायदे त्याच दिशेने जाणारे आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील. परंतु आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण दहा वर्ष मागे जाऊ’ असे मतही शिदोरे यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर शरद पवार यांचे एपीएमसीला पाठिंबा देणारे पत्र समोर आले आहे. याचा धागा पकडून शिदोरे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. ”राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी त्यांच्या “लोक माझे सांगाती..” ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढले पाहिजे असे म्हटले असल्याचे समजले. मी पुस्तक वाचलेले नाही पण हे खरं आहे का? असा थेट सवाल शिदोरे यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.

