दादर रेल्वे स्थानकातून राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दाखवला हिरवा कंदिल
मुंबई:गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले. मुंबई भाजपाच्या वतीने खास मोदी एक्स्प्रेसची व्यवस्था करण्यात आली.
दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी हिरवा कंदिल दाखवला. मोदी एक्सप्रेसमधून एकूण १८०० प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले. या उपक्रमासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मुंबईमधून मोठ्या संख्येने चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली आहे. गतवर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली होती. त्याला कोकणवासीयांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. मोदी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरणमान्यांच्या मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. या एक्स्प्रेसचा गेल्या वर्षी अनेक प्रवाशांनी लाभ घेतला. दरम्यान यंदाही मुंबई भाजपाच्या वतीने मोदी एक्स्प्रेस चालवण्यात आली आहे. गणेशभक्तांनी या सेवेबद्दल आनंद व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. “राज्यात गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. मोदी एक्सप्रेस या रेल्वेमुळे कोकणवासी खूश आहेत,” असं मत राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.