पुणे-
केंद्र सरकारच्या वतीने अटल मिशन अंतर्गत देशातील सर्व सरकारी शाळांसाठी मोठी मदत मिळते. याचा सविस्तर अभ्यास करुन आपापल्या प्रभागातील मनपा शाळांचे अत्याधुनिकीकरण करावे, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. कोथरूड मतदारसंघातील एरंडवणे मधील पुणे मनपा संचालित श्रीमती अनुसयाबाई खिलारे माध्यमिक विद्यालयातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे लोकार्पण श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमावेळी पुणे मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक जयंत भावे, दीपक पोटे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, प्रभाग समितीच्या स्विकृत सदस्या मिताली सावळेकर, कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, भाजप सरचिटणीस गिरीश भेलके, कोथरुड मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, पुणे शहर भाजपा प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस प्राची बागटे, बाळासाहेब धानवे, मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, उपाध्यक्ष राज तांबोळी यांच्यासह शाळेतल्या मुख्याध्यापिका सौ. नाईक आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, “शाळा, क्रीडांगण, प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून मुलांची सृजनशीलता वाढते. प्रयोगशाळा यातील अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अटल मिशनचा सर्व नगरसेवकांनी सखोल अभ्यास करुन, आपापल्या प्रभागातील शाळांचे अत्याधुनिकीकरण करावे.”
ते पुढे म्हणाले की, “केवळ महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नाहीत, त्यामुळे अनेकजण आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळांमध्ये करतात. हे चित्र बदलण्यासाठी आपण आपल्या सरकारच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट सव्वा लाखाने वाढवला. त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्वरुप बदललं. असेच अनेक प्रयोग महानगरपालिका शाळांसाठी करावे लागतील. यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले पाहिजे.” असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, नगरसेविका आणि पुणे मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी सहस्रबुद्धे यांच्या पुढाकारातून एरंडवणे येथील सर्वतीर्थ सुधीर फडके भूयारी मार्गाच्या नुतनीकरण कामाचे लोकार्पण श्री. पाटील यांनी केले.

