तूर्तास स्थगित केलेल्या अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत खुलासा केला. मनसेच्या अयोध्या दौऱ्याबाबत मुद्दाम वातावरण तापवले गेले. अन्यथा युपीच्या एका खासदाराची त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याची हिम्मत कशी काय होते?, असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच, या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा आरोपही त्यांनी केला.
माझ्या दौऱ्याला विरोध नेमका का होतोय, याबाबत मुंबईसह युपीतूनही माहिती मिळवली, तेव्हा आपल्याला हा अडकवण्याचा ट्रॅप आहे, हे मला समजले, असे राज ठाकरे म्हणाले. समजा मी हट्टाने अयोध्या दौऱ्याला जायचे असे ठरवलेच तर मनसैनिकांसह हजारो हिंदु बाधव दौऱ्यावर आले असते. दौऱ्यात आपल्याला कुणी डिवचले असत तर मनसैनिकही अंगावर धावले असते. त्यानंतर मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना केसेसमध्ये अडकवून तुरुंगात सडवले गेले असते. राज्यात ऐन निवडणुक असतानाच आपल्यावर कारवाईचा फास आवळला गेला असता. हा सर्व ट्रॅपच असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मात्र, यादरम्यान राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षाचे वा व्यक्तीचे नाव घेतले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचा रोख नेमका शिवसेनेवर होता की भाजपवर यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.राज ठाकरे यांनी आपल्या आजाराबाबतही सभेत माहिती दिली. पायांना त्रास होत असल्यामुळेच मला पुणे दौरा अर्धवट सोडावा लागला. माझ्या हीपबोनवर एक तारखेला शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अफजल खानच्या कबरीसाठी फंडिंग
एमआयएमचा माणूस औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यानंतर महाराष्ट्र खवळेल, अशी मला आशा होती. मात्र, महाराष्ट्र थंड होता. विजापूरहून शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या अफझल खानची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. या कबरीचा विस्तार आता 10 ते 15 हजार फुटांपर्यंत झाला आहे. तेथे अफजलखानच्या नावाने मशिदही बांधली जात आहे. त्यासाठी फडिंग येत आहे. फडींग करणाऱ्या या औलादी महाराष्ट्रात असूनही आपण थंड कसे, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी राज ठाकरेंनी माफी मागावी. अन्यथा त्यांना युपीत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा युपीचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी गुजरातमधील एका घटनेची आठवण ब्रिजभूषण सिंह यांना करुन दिली. काही वर्षांपुर्वी गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर शेकडो युपी, बिहारच्या कामगारांना ठार मारण्यात आले. त्यानंतर काही बचावलेले कामगार मुंबईत आले. गुजरातमधील या घटनेवरून ब्रिजभूषण कोणाकडे माफीची मागणी करणार, असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच, एवढ्या वर्षांनंतर उत्तर भारतीयांची आठवण कशी झाली, असा सवाल करत हे राजकारण समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
अनेकांना अयोध्या वारी खुपली
अनेकांना माझी अयोध्या वारी खुपली. त्यामुळेच आपल्याला त्यात अडकवण्याचा आराखडा रचला गेला. मात्र, मला अयोध्येत केवळ राम मंदिराचे दर्शन घ्यायचे नव्हते. बाबरी मशिदीचे आंदोलन झाल्यानंतर अयोध्येत काही कारसेवकांचीही जाळून हत्या करण्यात आली होती. ती जागाही मला पाहायची होती. मात्र, मला विरोध करुन काहींनी हिंदुत्वाचेच नुकसान केले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
मातोश्री मशिद आहे का?
मी हनुमान चालिसा म्हणण्याचे आवाहन केल्यानंतर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरला. मातोश्री म्हणजे मशिद होती का?, असा सवाल करत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्यावरही टीका केली. तसेच, मनसेचे हिंदुत्व हे केवळ आंदोलनासाठी नव्हे तर रिझल्ट देणार आहे. मात्र, मुख्यमंत्री कोणाच हिंदुत्व खरे आणि कोणाचे खोटे, अशी पोरकट भाषा करत आहे. त्यांनी रिझल्ट दाखवावा. उद्धव ठाकरेंच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? ते कोणती भूमिकाच घेत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
मुख्यमंत्री गांधी आहेत का?
मुख्यमंत्री म्हणतात, औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्याची आवश्यकता काय? पण मुख्यमंत्री आहेत तरी कोण? ते वल्लभभाई पटेल आहेत की महात्मा गांधी?, असा सवाल राज ठाकरेंनी केला. औरंगाबादचे नामांतर करायचे असते तर आतापर्यंत झाले असते. मात्र, शिवसेनेला केवळ राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करायचा आहे. त्यामुळेच हा मुद्दा सतत पेटता ठेवला जात आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. मुख्यमंत्र्यांच्या अशा राजकारणामुळेच औरंगाबादेत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करुन एमआयएमचा खासदार निवडून आला. हेच एमआयएमचे नेते औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होत आहे आणि आपल्या राज्यकर्त्यांना याची लाजही वाटत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. शिवसेनेमुळेच एमआयएम वाढत आहे, असा आरोपही त्यांनी केला
मोदींकडे 3 मागण्या
शरद पवार म्हणतात अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी नव्हे तर राज्य विस्तारासाठी आला होता. आता तरी पवारांनी असे राजकारण बंद करावे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, पंतप्रधान मोदींकडे माझ्या तीनच मागण्या आहेत. देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणा, समान नागरी कायदा लागू करा आणि, या माझ्या मागण्या असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांना टोला
आपल्या सभांना हॉल, सभागृह पुरवडत नाही. एसपी कॉलेजनेही आपल्याला सभेसाठी हॉल देण्यास नकार दिला. आम्ही कोणालाच सभागृह देत नाही, असे कॉलेजने सांगितले. त्यामुळे आम्हाला नाही तर ते सभागृह आता कोणालाच नाही, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला. तसेच, पुण्यात मैदानावर जाहीर सभा घ्यायची होती. मात्र, पावसाची शक्यता होती. म्हटल आता निवडणुका नाही तर उगीच भिजत सभा कशाला घ्यायच्या, असा खोचक टोलाही राज ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला.
भोंग्यांसाठी आंदोलन सुरुच राहिल
मशिदींवरील भोंग्यांसाठी आंदोलन केल्यानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता मशिदींवरील भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी प्रशासन मशिदींच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा करत आहे. म्हणजेच ज्यांनी कायद्यांचा आग्रह धरला त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांचा छळ केला जात आहे. तर, बेकायदा वागणाऱ्यांसोबत राज्य सरकार चर्चा करत आहे. हे कोणते कायद्याचे राज्य, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
आदित्य ठाकरेंवर टीका
आज महाविकास आघाडी पाहून बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यावरही राज ठाकरे यांनी टिका केली. असे वक्तव्य करुन बाळासाहेब ठाकरेंची प्रतिष्ठा कमी करु नका. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे तरी समजले आहेत का, असा सवाल त्यांनी केला.