पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजकीय पक्षाकडून जाहीर झालेली ही पहिलीच उमेदवारी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे.
रुपाली पाटील या पक्ष स्थापनेपासून (14 वर्षांपासून) मनसेमध्ये कार्यरत आहेत. महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांचे विशेष काम आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे, त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास ही भोगला आहे.
त्या उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.कॉम LLB झाले आहे. त्या व्हॉलीबॉल आणि शुटिंग व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.
पदवीधर, युवक-युवतींचे रोजगाराचे तीव्र झालेले प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे रुपाली पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर बोलताना सांगितले.