पुणे-ज्यांच्यामुळे आपण मनोरंजनाची दिवाळी बाराही महिने साजरी करू शकतो अशा बॅकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने फराळ साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी साखर, रवा, बेसन इत्यादी फराळासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते सुगंधी तेल, उटणे आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सुमुहूर्तावर प्रेक्षकांच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या परंतु कायमच पडद्यामागे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष भेट देण्याची मूळ संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांची असून अमेय खोपकर यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, सिटीप्राईड कोथरूड, महात्मा फुले सांस्कृतिक भवन या ठिकाणी जाऊन १०० हून अधिक डोअर कीपर, सफाई कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट देण्यात आली.
अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, म.न.से. चे किशोर शिंदे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे प्रातिनिधी सत्यजित दांडेकर, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका आणि नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे, मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे, मनसे उपाध्यक्ष रणजित शिरोळे, चित्रपट निर्माते पुनित बालन यांच्या हस्ते या दिवाळी भेटीचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष सागर पाठक, मनसेचे पदाधिकारी आनंद कुंदूर, चेतन धोत्रे, प्रशांत गायकवाड, चिन्मय अभ्यंकर, प्रज्ञा राज,निनाद सूर्यवंशी, प्रशांत बोगम, कुशल शिंदे, आकाश क्षीरसागर, अजय देवपुंजे, गोकुळ दशवंत हे तसेच रोहित खडसे, गौतम एरवा, आशुतोष पवार, शुभम मेश्राम हे उपस्थित होते.