पुणे -महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. गजा मारणेवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची लगबग वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 10 मधून अधिकृत उमेदवार असतील. त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गजा मारणे सध्या कोथरूडमधील एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात बंदिस्त आहे. हा दुचाकीस्वार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करत होता. त्याला गजा मारणे याच्या टोळीने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती.
अजित पवारांनी एका कार्यक्रमात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील कोयता गँग बंद करण्याची सूचना केली होती. आम्ही तुमच्यासाठी पोलिसांची संख्या वाढवली. तुम्ही आता गुन्हेगारी आटोक्यात आणण्यावर भर द्या, असे ते म्हणाले होते. पण आता अजित पवारांचा पक्षच एका गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेवर खंडणी, दहशत, खून यासारखे अनेक गुन्हे आहेत. गजा मारणेच्या घरी मध्यंतरी काही नेत्यांनी भेटही दिली होती. आता पुन्हा त्याच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने गुंडांना राजकीय पाठबळ दिले जात आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

