दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दिला दुजोरा …
पुणे-विशाल तांबे , दत्ता धनकवडे यांच्यानंतर आता सुभाष जगताप या राष्ट्रवादी च्या नेत्यांनी शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भूमिकेवर कडाडून विरोध क्कार्याला सुरुवात केली आहे. आज सुभाष जगताप जे अजित दादा गटाचे शहर अध्यक्ष देखील आहीत त्यांनी प्रशांत जगताप स्वार्थी असल्याचे म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आणि प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दिला दुजोरा दिला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास तीव्र विरोध दर्शवत पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती, त्याचे रूपांतर आता बंडात झाले असून, प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याने पुण्यात शरद पवार गटात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.प्रशांत जगताप यांनी सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या गटासोबत कोणत्याही प्रकारची युती नको, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी यापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवल्यास पक्षाला काय फायदा होईल आणि अजितदादांसोबत गेल्यास काय तोटा होईल, याचे सविस्तर राजकीय गणित मांडले होते. खुद्द शरद पवार यांनीही सुरुवातीला दादांच्या गटासोबत न जाण्याचे संकेत दिले होते, मात्र अचानक खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नेत्यांना अजित पवार यांच्या गटाशी चर्चेचे निर्देश दिल्याने प्रशांत जगताप प्रचंड नाराज झाले आहेत.”जर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असतील, तर मी पक्षात राहणार नाही,” अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी जाहीर केली होती. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून आलेल्या नव्या निर्देशांमुळे प्रशांत जगताप यांनी आज अखेर आपला राजीनामा सोपवला आहे. जरी अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नसला, तरी जगताप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुण्यातील इतर नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशांत जगताप सध्या कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते.

