पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘१८७० मध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम पुण्यामध्ये शिवजंयती सार्वजनिकरित्या साजरी केली. तेव्हा पासून आजपर्यंत आपण आनंदाने आणि उत्याहाने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपल्या राजाला शिवजंयती निमित्त अभिवादन करीत असतो. महाराजांचा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहे, तरीही सध्याच्या परिस्थितीला अनुसरून त्यांच्या कार्य कर्तृत्वातील असंख्य बाबी आपण आजही व्यवहारात आणणे अत्यंत आवश्यक आहे. मुळात लोकांचे राज्य म्हणून महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. १८ पगड जाती, १२ बलुतेदार समाज हा स्वराज्याचा मावळा म्हणून ओळखला जायचा. परंतु आज काही संकोचित मनोवृत्तीने महाराजांच्या या मावळ्यांना विविध जाती आणि धर्मांच्या आधारे विखुरण्याचा घाट घातला आहे. शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांविषयींचे धोरण, महिलांविषयी असलेला आदर, व्यापाराला चालना देणारी व्यवहारिकता असे असंख्य गुण झाकळून त्यांच्या व्यक्तिमत्वाविरोधी असणारे कृत्य सत्येत बसलेली मनुवादी वृत्ती करताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्व संकुचित करून त्यांचा इतिहास पुसण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी व महाराजांचा सत्य इतिहास जतन करून पुढच्या पिढ्यांना तो बहाल करण्यासाठी आपल्याला त्यांचे मावळे बनून हा लढा अखंड सुरू ठेवला पाहिजे. कोणत्याही प्रक्षोभणांना, धमक्यांना अथवा हल्ल्यांना भिक न घालता महाराजांचे वैचारिक वारस म्हणून त्यांना अभिप्रेत असणारे स्वराज्य पुन्हा नव्याने उभारण्यासाठी वैचारिक कृतीशिलतेची तलवार हाती घेऊन मनुवादी वृत्ती मुळापासून उखडून काढली पाहिजे.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, नगरसेवक अविनाश साळवे, प्रशांत जगताप, अश्विनी लांडगे, उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाने, कामगार नेते सुनिल शिंदे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, सिमा सावंत, सुंदर ओव्हाळ, कांचन बालनायक, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, उस्मान तांबोळी, ॲन्थोनी जेकब, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, राज अंबिके, गौरव बाळिंदे, फैय्याज शेख, सुरेश नांगरे, संदिप मोकाटे, सेवादलाचे लतेंद्र भिंगारे, फिरोज शेख, संतोष देसाई, मंगेश मोहिते, गोरख भालेकर, आदित्य ओव्हाळ, अमित कांबळे आदीसंह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शिवजयंती साजरी.
Date:

