‘पद्मश्री’ डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळा; माईंचा खडतर प्रवासाची गोष्ट उलगडून सांगणारा चिंधीची गोष्ट या बालकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा
पुणे: अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ ( माई ) यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या ‘माई परिवार’तर्फे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यावर्षी या पुरस्काराचे चौथे वर्ष.
यंदाचा हा मानाचा ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार’ सामाजिक क्षेत्रात निस्पृहपणे काम करणाऱ्या मा. रेणुताई गावस्कर (अध्यक्षा – एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि सेवा संकल्प प्रतिष्ठान (चिखली, जि. बुलढाणा) यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती ममता सिंधुताई सपकाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. माईंचा खडतर पण प्रेरणादायी जीवनप्रवास लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘चिंधीची गोष्ट’ हा विशेष बालकथासंग्रह तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा. पद्मश्री श्री. गिरीश प्रभुणे भूषवतील, प्रमुख पाहुणे म्हणून भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी उपस्थित राहणार आहेत तर विलू पूनावाला फाऊंडेशनचे सीईओ जसविंदर नारंग यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर (अमरावती) या करतील.
माईंच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि त्यांच्या कार्यात रस असणाऱ्या सर्व पुणेकरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माई परिवारातर्फे करण्यात आले आहे.

