पुणे-पुण्याच्या राजकारणात सातत्याने नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यतच अर्ज दाखल करता येणार आहे. पण अजूनही सत्ताधारी आणि विरोधकांचं जागावाटप ठरताना दिसत नाही. विशेष म्हणजे आज अतिशय नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. महापालिका निवडणूक जाहीर झाली तेव्हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होईल असं जाहीर केलं होतं. पण अजूनपर्यंत तरी भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. विशेष म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करुन हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तो सुटला नाही. आता पुण्यातील शिवसेनेचे बडे नेते रवींद्र धंगेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
रवींद्र धंगेकर हे त्यांच्या पत्नी आणि मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. पण भाजपकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने धंगेकर थेट अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत.किरण साळी देखील त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्र युती होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

