पुणे- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वेगवान राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांत भाजपमध्ये इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. मात्र आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास बाकी असताना भाजपलाही जोरदार गळती लागली आहे.एकीकडे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयासमोरच धरणे धरत निदर्शने करत भाजपा नेत्यांच्या नावे **** हासडयला सकाळी सुरुवात केली तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी रांग लागल्याचे दिसले. शहरातील प्रभाग क्रमांक 27 मधून तिकीट न मिळाल्याने माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर अजितदादांच्या कडे भाजपचे माजी नगरसेवक शंकर पवार ,कॉंग्रेसचे शिवाजीनगर विधानसभा लढविलेले दत्ता बहिरट आणि बरेच कार्यकर्ते प्रवेशासाठी अंकुश काकडे, योगेश वऱ्हाडे यांच्या सहाय्याने पोहोचल्याचे दिसले .
धनंजय जाधव हे भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या पर्वती – नवी पेठ या प्रभागात इच्छुक होते. मात्र भाजपकडून त्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यानंतर जाधव हे अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी दाखल झाले. या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.
पुणेभाजपा कार्यालया समोरच आज सकाळी आठवले गटाच्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आणि चक्क भाजपा नेत्यांच्या नावानी ++++ हासडल्या . रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देतो सांगून भाजपा भाजपमधीलच कार्यकर्त्यांना उमेदवारी देत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. अशाने रिपब्लिकन पक्ष संपायला किंवा एक – दोन कार्यकर्त्यात विभागायला वेळ लागणार नाही असेही म्हणणे कार्यकर्त्यांनी मांडले

