आपल्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना सूचना देताना राज ठाकरे म्हणाले, इतकी वर्षे आपण सत्तेविना राहिलो पण आपल्या पक्षाचा दबदबा कमी झालेला नाही. आज भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम आहे, या जीवावर ते माज करत आहेत. अशाप्रकारे सत्तेविना राहण्याचे प्रसंग देशाच्या इतिहासात अनेकदा आले आहेत. अनेकांना वाटते की भाजपमध्ये गेले तर फायदा होईल. पण भाजपमधील लोकांवर टांगती तलवार आहे. ही सगळी बसवलेली माणसे आहेत.
मुंबई -महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून, गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मनसे युतीमध्ये निवडणूक लढवत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करणे आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जपणे हेच पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगतानाच, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना ‘युती धर्म’ पाळण्याचे आणि विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचे आदेश दिल्याचे नांदगावकर यांनी यावेळी नमूद केले.
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी विशेषतः मराठी माणसांसाठी मुंबई खूप महत्त्वाची आहे. निवडणुका येतात आणि जातात. पण जे काही लोकांचे स्वप्न आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग सुरू केले आहे. बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे आणि त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त करायचे आहे. ही मुंबई आपली आहे, महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे. साहेब नेहमी बोलतात, भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
पुढे बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, काही जागा येतात काही जागा जातात, काही लोकांना वाईट वाटले असेल. गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच युतीमध्ये लढत आहोत. त्यामुळे युती धर्मही पाळायचा आहे आणि प्रत्येक जागा आपल्याला महत्त्वाची आहे. रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे झोकून देऊन काम करायचे आहे, अशा सूचना राज साहेबांनी दिल्या आहेत. तसेच जिथे शिवसेनेचे उमेदवारी अर्ज भरत असतील, आपल्याला तिथे देखील सहभागी व्हायचे आहे, असा संदेश साहेबांनी दिला आहे.
आज एबीफॉर्म दिले जाणार
आज एबीफॉर्म दिले जाणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच किती जागा आम्ही लढवणार आहोत हे फॉर्म आल्यावरच समजेल. आत्तापर्यंत आमच्या पक्षाने 20 वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत. आम्ही कधीही युती, आघाडीमध्ये गेलो नाही. ही पहिली निवडणूक आहे, ज्यात आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवत आहोत. युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही, यात काही जागा इकडे तिकडे होतात. त्यामुळे नाराजी होऊ शकते. पण ही एकच निवडणूक नाही, वारंवार निवडणुका ठाकरे बंधू लढवणार आहेत आणि सगळ्यांना संधी दिली जाईल, अशी ग्वाही नांदगावकर यांनी दिली आहे.

