पुणे :महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आघाडीची घोषणा केली आहे. हे पक्ष मनसे व महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षालाही सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे याठिकाणी भाजप – शिवसेना विरुद्ध काँग्रेस – ठाकरे गट – मनसे – रासप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. यासाठी सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काही ठिकाणी या दोन्ही आघाड्यांतील घटकपक्ष एकमेकांविरोधात लढतानाही दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस व ठाकरे गटाने आघाडी करत भाजप व दोन्ही राष्ट्रवादींना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर व काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे या युतीची घोषणा केली.
पुण्यात बदल घडवायचा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांचाच पर्याय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यास नकार दिला आहे. यामागे त्यांची एक रणनीती आहे. राज्यात विरोधकच शिल्लक राहू नये ही यामागील भूमिका आहे. पण आम्ही असे होऊ देणार नाही, असे सचिन अहिर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.
सतेज पाटील म्हणाले, पुण्यात महापौर कुणाचा? हा प्रश्न महत्त्वाचा नाही. आमच्यासाठी पुणेकरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोणत्याही पदापेक्षा पुणेकर ज्या समस्यांना तोंड देत आहेत, त्या सोडवण्याकडे आमचा कल असणार आहे. वाहतुकीचा प्रश्न असो किंवा शहरातील इतर प्रश्न असोत ते नागरिकांना भेडसावू नयेत असा आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीत आमच्या आघाडीला सत्ता मिळाली तर आम्ही त्या दृष्टिकोनातून पाऊले उचलू.
पत्रकारांनी यावेळी सतेज पाटील व सचिन अहिर यांना पुण्यात मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न केला. त्यावर सतेज पाटील म्हणाले, आमच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. मनसे व रासप सारख्या घटकपक्षांशी आमची आमच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. या प्रकरणी आज उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपविरोधी सर्वच विरोधी पक्ष आमच्यासोबत आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दर आठवड्याला एकत्र बसणारे पक्ष या निवडणुकीत वेगळे लढत आहेत. यावरून सर्वकाही स्पष्ट होते. आमचा उद्देश भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवणे एवढाच आहे, असे ते म्हणआले.

