पुणे: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या प्रकरणी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांना गृहीत धरले होते. आमच्या मागील 3-4 महिन्यांत अनेक बैठकाही झाल्या. त्यात पिंपरी चिंचवड निवडणूक मिळवून लढवण्याचा निर्णय झाला. पण अचानक त्यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाविकास आघाडीसाठी धक्काच आहे, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात आहे तशी ती पिंपरी चिंचवडमध्येही असावी अशी आमची ठाम भूमिका होती. त्यानुसार जागावाटपावर चर्चाही झाली होती. पण दुर्दैवाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या. आमची फसवणूक झाली. त्यांनी आमच्याशी शेवटपर्यंत चर्चा केली. त्यानंतर अजित पवारांशी घरोबा करत आमची फसवणूक केली. महाविकास आघाडीचा प्लॅन A फोल ठरला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला वगळून प्लॅन B तयार केला जात आहे, असे चाबुकस्वार म्हणाले.
दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजप व शिवसेनेची युतीही रखडली आहे. असे असले तरी दुसरीकडे, भाजपचे 128 जागांचे सर्व एबी फॉर्म प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. भाजपने याला दुजोरा दिला आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे इथे युती तुटली तर भाजप व आठवलेंची रिपाइं एकत्र लढणार आहे. विशेषतः या प्रकरणी शिंदे गटाने अधिक जागांची मागणी केली तर भाजपने सर्व 128 जागांचे एबी फॉर्मही तयार ठेवलेत. त्याची माहिती त्यांनी शिवसेनेलाही दिली आहे.

