पुणे :भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव सुरु केला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागलेला असताना आता भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर केली जाणार नाही.ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे अशांना थेट फोन करून अर्ज भरण्याचा निरोप दिला जाणार आहे. त्यांना पक्षातर्फे ए, बी फॉर्मही पोहच केला जाणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने ही चाल खेळली आहे.
पुणे महापालिकेसाठी भाजपकडे इच्छुकांची झुंबड उडाली आहे. प्रत्येक प्रभागात ३० पेक्षा जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे कोणत्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची याचा पेच निर्माण झाला आहे. आपले नाव उमेदवार यादीत यावे यासाठी इच्छुकांकडून भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी कायम गर्दी होत आहे. त्यातील अनेक जण हे उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचे सांगत थेट प्रचार सुरु केला आहे. एकाच प्रभागात अनेकजण असा प्रचार करत असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे कळत नाही अशी स्थिती आहे.
भाजपकडून २६ डिसेंबर रोजी मतदार यादी जाहीर होईल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते. त्यानंतर २८ डिसेंबर रोजी रात्री उशिरा यादी जाहीर होईल असे सांगितले होते. पण आता यादीच जाहीर न करता ज्यांची उमेदवारी निश्चित आहे त्यांना प्रमुख नेत्यांकडून फोन केले जात आहेत. त्यांना उद्या (ता. २९) पक्षातर्फे गुप्त पद्धतीने ए, बी फॉर्म दिले जाणार आहेत. त्यामुळे अधिकृत उमेदवारी नेमकी उमेदवारी कोणाला मिळाली आहे याचा संभ्रम निर्माण होणार आहे.
भाजपने उमेदवार यादी जाहीर न करता थेट निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. पण जवळपास सर्वच प्रभागातील इच्छुकांनी त्यांचे उमेदवारी अर्ज भरून ठेवले आहेत. त्यामुळे अशा इच्छुकांकडून सोमवारी व मंगळवारी अर्ज भरले जाणार आहेत. त्यानंतर अधिकृत उमेदवार नसणाऱ्या नाराज इच्छुकांचे अर्ज माघारी येण्याचे आणि त्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान असणार आहे. तसेच उमेदवारी न मिळाल्यास अनेकजण अन्य पक्षात जाऊ शकतात, त्यांना रोखण्याचे आव्हान आहे.

