मुंबई-गोरेगाव येथील एका प्रतिष्ठित बिल्डरला 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून खंडणीविरोधी पथकाने अभिनेत्री हेमलता पाटकर उर्फ हेमलता बाणे आणि अमरिना झवेरी यांना बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी (27 डिसेंबर) या दोन्ही आरोपींना एस्प्लेनेड न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली आहे.
अरविंद गोयल (वय 52 वर्षे) हे गोरेगाव पश्चिम येथील रहिवासी असून ते पेशाने बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या मुलावर आंबोली पोलिस ठाण्यात एक फौजदारी खटला दाखल आहे. हा खटला मिटवण्यासाठी आणि मुलाला कायदेशीर त्रासातून वाचवण्यासाठी अभिनेत्री हेमलता पाटकर आणि अमरिना झवेरी यांनी गोयल यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खंडणी स्वरूपात उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच अरविंद गोयल यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री हेमलता पाटकर उर्फ हेमलता बाणे,(वय 39 वर्षे) यांचा इतिहास वादग्रस्त आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी मेघवाडी पोलिस ठाण्यात मारहाण, बेकायदेशीर प्रवेश आणि शिवीगाळ (कलम 452, 323, 504) यांसारखे गुन्हे दाखल आहेत. तर दुसरी आरोपी अमरिना इक्बाल झवेरी (उर्फ एलिस, 33 वर्षे) हिचाही या खंडणीच्या कटात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, हेमलता पाटकर यांच्या हस्ताक्षराचे नमुने आणि अमरिना झवेरी यांच्या आवाजाचे नमुने अद्याप गोळा करायचे आहेत. बिल्डरने खंडणीच्या व्यवहाराबाबतचा सविस्तर लेखी पुरावा पोलिसांना सोपवला आहे, ज्याची पडताळणी होणे बाकी आहे. या टोळीने आणखी किती बिल्डर्स किंवा प्रतिष्ठित व्यक्तींना अशा प्रकारे लुटले आहे, याचाही संशय पोलिसांना आहे. मात्र, दोन्ही आरोपी महिला तपासात अजिबात सहकार्य करत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.
मुलावरील खटला मिटवण्याच्या नावाखाली 10 कोटींची खंडणी मागणाऱ्या या ‘हाय-प्रोफाईल’ आरोपींचा तपास आता अधिक तीव्र करण्यात आला आहे. सोमवारपर्यंतच्या वाढीव कोठडीत या प्रकरणातील इतर फरार आरोपींचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

