मुंबई-उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका करतानाच, कार्यकर्त्यांना एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले. “दोन गुजराती आपल्या महाराष्ट्राला गिळायला निघाले असताना आपण जर आपसात भांडत बसलो, तर ही लढाई न लढलेलीच बरी,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या संघर्षाची दिशा स्पष्ट केली.कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे भाजपविरोधात कमालीचे आक्रमक दिसले. ते म्हणाले, “भाजपला महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हते, आम्ही त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि खेडोपाडी नेले. आम्ही ज्यांना मोठे केले, आज तेच आमच्यावर वार करत आहेत. भाजपने केवळ युती तोडली नाही, तर ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. इतकी वर्षे ज्यांनी आपला केवळ उपयोग करून घेतला, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे.”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) झालेल्या युतीबाबत बोलताना त्यांनी वास्तववादी भूमिका मांडली. “ज्यावेळी युती किंवा आघाडी असते, त्यावेळी १०० टक्के आपल्या मनासारखे घडत नाही. काही जागा आपल्या हक्काच्या असतात, पण नायलाजाने त्या मित्रपक्षासाठी सोडाव्या लागतात. मला माहिती आहे की काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असेल, पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी हा वाईटपणा घ्यायला तयार आहे. तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अत्यंत भावनिक आवाहन केले. “तुम्ही एकदा माझ्या खुर्चीत बसून बघा आणि समोरच्या चार माणसांना निवडून दाखवा, म्हणजे जबाबदारी काय असते हे समजेल. विभागप्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी अजिबात डगमगून जाऊ नका. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी जगाच्या नजरेत वाईट ठरलो तरी चालेल, पण आपली ताकद विखुरली जाता कामा नये,” असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावून सांगितले.
या युतीचा मुख्य उद्देश मुंबईवरील मराठी माणसाचे वर्चस्व टिकवून ठेवणे हाच आहे. राज ठाकरे यांनीही यापूर्वीच जाहीर केले आहे की, मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा मराठी माणसाचाच महापौर बसेल आणि तो आपल्या युतीचाच असेल. मुंबई कोणाही परक्याच्या हातात हिसकावू देणार नाही, असा ठाम निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

