विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्याचे केले आवाहन
पुणे, दि. २८ :
विजयस्तंभास अभिवादनाकरिता येणारे अनुयायी आणि बुकस्टॉल धारकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲड गोरक्ष लोखंडे यांनी केल्या.
हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसरास भेट देऊन १ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत प्रत्यक्ष स्थळपाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, स्थानिक पदाधिकारी अनुयायी उपस्थित होते.
ॲड. लोखंडे म्हणाले, विजयस्तंभाच्या परिसर ही क्रांतिकारी भूमी असून या भूमीला वंदन करण्याकरिता देशाच्या विविध भागातून अनुयायी येतात. त्यांना सोई-सुविधा पुरविण्याकरिता स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, नागरिक अहोरात्र जबाबदारीपूर्वक काम करीत आहेत. बार्टी व समाज कल्याण विभागामार्फत सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो, या निधीचा पुरेपूर उपयोग करुन सोहळा अतिशय आनंदात साजरा होईल, याबाबत दक्षता घ्यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्याकरिता अनुयायी, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासन, सामाजिक संघटना व नागरिकांनी समन्वय साधून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा.
विजयस्तंभ परिसरात एलईडी स्क्रीनवर संविधानाबाबत माहिती देणारी चित्रफीत लावण्यात यावी. महिलांकरिता उभारण्यात येणाऱ्या शौचालय आणि हिरकणी कक्षामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. बुक स्टॉल धारकांना जागा, वीज, पाणी, चटई, जेवण, अल्पोपहार, टेबल आदी सुविधांसोबतच हिवाळा ऋतूंचा विचार करता त्यांच्याकरिता निवारा कक्षाची व्यवस्था करावी.
या वर्षी येणाऱ्या अनुयायांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुयायांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन लोखंडे यांनी केले.
यावेळी विजयस्तंभ सजावट, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे टँकर, हिरकणी कक्ष, बसेसचे नियोजन, पुस्तक विक्री स्टॉल, शौचालये, वाहनतळ, रस्ते दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, मनुष्यबळ आदींबाबत आढावा घेतला.

