बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक नूतन वास्तूचे उद्घाटन बारामती येथे होत आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उद्योगपती श्री. गौतम अदानी तसेच ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उद्या होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी आज विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात भेट देऊन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.इंदापूर रस्ता व बस स्थानक परिसराचं सुशोभीकरण, सेंट्रल पार्क समोरील रस्त्याचं सौंदर्यीकरण, महापुरुषांच्या पुतळ्यांची कामं, स्विमिंग पूलचं प्रगतीपथावरील काम तसंच गौतम बाग ते फडतरे वस्ती या चारपदरी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
बारामती शहर आणि परिसराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध व दर्जेदार विकास हाच मुख्य उद्देश आहे. विकासकामं वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन पूर्ण व्हावीत, यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या स्पष्ट सूचना केल्या. यावेळी त्यांनी तयारीचा आढावा घेत सर्व व्यवस्था योग्य व नियोजनबद्ध असल्याची खात्री केली.
या पाहणीदरम्यान विद्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण आणि नवोन्मेषाला चालना देणारे हे केंद्र शैक्षणिक क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

