पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आसवानी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर डब्बू आसवानी उपस्थित होते.
धनराज आसवानी हे भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी सविता धनराज आसवानी या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर ३००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने वॉर्ड क्रमांक १९ मधून निवडून आल्या होत्या. २०१७ मध्ये धनराज आसवानी यांनी याच वॉर्ड मधून भाजपा च्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. दिवंगत आमदार तथा भाजपा शहर अध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या बरोबर धनराज आसवानी यांनी भाजपा शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती. सिंधी समाज आणि प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांबरोबर त्यांचा चांगला संपर्क आहे. २००५ – ०६ या काळात सेवा विकास बँकेचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्या काळात त्यांनी या बँकेचे ‘एनपीए’ चे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणले होते. धनराज आसवानी हे सध्या पिंपरी मर्चंट फेडरेशनचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. धनराज आसवानी यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत पिंपरी मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयाचे नूतनीकरण, साधू वासवानी उद्यानाचे नूतनीकरण, जयहिंद हायस्कूलचे नूतनीकरण आणि मिलिंद नगर स्मशान भूमीचे नूतनीकरण केले आहे. तसेच पूर्ण पिंपरी कॅम्प मधून हाय टेन्शन वायर काढून भूमिगत केबल टाकली, प्रभागात असणाऱ्या झोपडपट्टी मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह व आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पवना नदीच्या झुलेलाल घाटावर गणपती विसर्जन कुंड उभारणे, घाटावर डबर टाकून नूतनीकरण केले. कोविड काळात नदीलगत असणाऱ्या संजय गांधी नगर, मिलिंद नगर, रिव्हर रोड परिसरातील नागरिकांना ब्लॅंकेट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना दिलासा दिला आहे. धनराज आसवानी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.
भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
Date:

