पुणे-आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने थेट तुरुंगातून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला शनिवारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला होता .
तोंडावर काळं कापड, पोलिसांच्या दोरखंडात जखडलेला आणि कडक बंदोबस्तातील बंडू आंदेकर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अर्ज भरताना विजयाची खूण दाखवत होता. मात्र आंदेकरसह तीघांचेही अर्ज अर्धवट असल्याने ते स्विकारले गेले नाहीत. यामुळे पोलिसांनी बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईसाठी केलेली मेहनत वाया गेली. आता पुन्हा एकदा पोलिसांना बंदोबस्ताची तयारी करावी लागणार आहे.
‘नेकी का काम, आंदेकर का नाम’ अशा घोषणांसह त्याने निवडणूक कार्यालयात प्रवेश केला. ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासकामांना मत’. ‘मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही’. ‘वनराज आंदेकर जिंदाबाद’, अशा घोषणा बंडू आंदेकर देत होता.
तिघेही रिंगणात –
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आंदेकर कुटुंबातील तिघांना विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर यांनी शनिवारी अर्ज भरले. बंडू आंदेकरला मिरवणूक, भाषण आणि घोषणाबाजी करण्यास स्पष्ट मनाई केली होती. तरीही बंडू आंदेकर प्रत्यक्षात घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन करताना पाहायला मिळाले. आंदेकर कुटुंबातील हे तिघेही प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तीघांनेही वकिलांच्या मदतीने अर्ज दाखल केले. मात्र ते अर्धवट असल्याने स्विकारले गेले नाहीत. यामुळे तीघांनाही पुन्हा अर्ज भरण्यासाठी यावे लागणार आहे.
कडेकोट बंदोबस्त –
बंडू आंदेकरला खंडणीच्या गुन्ह्यात गुन्हेशाखेच्या पोलीस कोठडीत आहे. लक्ष्मी, सोनाली आंदेकर कोल्हापूरच्या तुरुंगात आहेत. त्यांना तेथून सकाळी साडे नऊला शहरात आणले. तिघांनाही साडे अकराच्या सुमारास क्षेत्रीय कार्यालयात आणले. ते दुपारी तीन वाजता बाहेर पडले. तोपर्यंत परिसरात कडक बंदोबस्त होता. पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेची पथके तैनात केली होती. परिसरात बॅरिकेटस लावून नागरिकांना बंदी घातली होती. यामुळे आंदेकर टोळीचे नंबरकारी तिकडे फिरकलेच नाहीत.
पोलिसांनी सांगितले की, बंडू आंदेकरसह तीघे अर्ज भरायला आले होते. मात्र ते क्षेत्रीय कार्यालयात दाखल होईपर्यंत, त्यांच्या वकिलांनी अर्ज भरुन घेतले नव्हते तसेच अर्जावर त्यांच्या सह्याही घेतल्या नव्हत्या. ते दाखल झाल्यावर अर्ज भरण्यात आले. दरम्यान अर्ज स्विकारले न गेल्याने, त्यांना पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्यास यावे लागणार आहे.

