केंद्रीय मंत्री मोहोळ आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्याकडून विरोधकांना जोरदार तडाखे …
शिवरकरांना प्रशांत जगतापांविरोधात उतरवणार?
पुणे- महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांना जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव अभिजित शिवरकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. हा ‘हाय-व्होल्टेज’ पक्षप्रवेश पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी बातमी मानली जात असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्येच मोठे भगदाड पडले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सुरू असलेली ‘इनकमिंग’ची लाट आजच्या या दोन बड्या नेत्यांच्या प्रवेशाने अधिकच गडद झाली आहे. 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने, प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या काळातच विरोधकांचे महत्त्वाचे बुरुज ढासळल्याने महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
अभिजित शिवरकर यांचा वानवडी परिसरात मोठा प्रभाव असून, 2007 मध्ये ते सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले होते. “14 वर्षांचा वनवास संपवून आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी निवडणुकीत वानवडी भागातून काँग्रेसचे प्रशांत जगताप यांच्या विरोधात भाजपकडून शिवरकर यांना मैदानात उतरवले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिवरकर यांनी पुणे शहराच्या शाश्वत विकासासाठी भाजपची वाट धरल्याचे स्पष्ट करत, नवीन पक्षातही निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वानवडीतील काँग्रेसची हक्काची मते भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, वारजे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मोठा कणा मानले जाणारे दिलीप बराटे यांच्या पक्षप्रवेशामुळे सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षालाच मोठा फटका बसला आहे. दिलीप बराटे यांची स्थानिक पातळीवर मजबूत संघटनात्मक ताकद असून ते अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पश्चिम पुण्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असून, भाजपची ताकद वारजे आणि कोथरुड परिसरात दुपटीने वाढली आहे.
महापालिका निवडणुकीने पुण्याचे वातावरण आता पूर्णपणे तापले आहे. एका बाजूला भाजपमध्ये मोठ्या नेत्यांची रांग लागली असताना, दुसरीकडे जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कुरबुरी अजूनही सुरूच आहेत.

