पुणे -महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेला किमान २५ जागा द्याव्यात, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमधील विजयाच्या आकडेवारीनुसार शिवसेनेला सरासरी ४७ जागा मिळणे अपेक्षित होते, मात्र सध्या २५ जागांची मागणी करण्यात आली आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. आगामी मनपा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
या संदर्भात, मंत्री उदय सामंत यांनी काल रात्री भाजपला २५ वॉर्डांची यादी सादर केली आहे. या यादीवर भाजपने विचार करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजय शिवतारे यांच्याशी चर्चा केली असून, ते उदय सामंत यांच्याशीही बोलणार आहेत. वॉर्डनिहाय यादीबाबत शिवतारे, धंगेकर, अजय भोसले आणि आबा बागुल यांच्यासोबत बैठक झाली आहे. या सर्व घडामोडींवर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील.
डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, नाना भानगिरे हे त्यांच्या खासगी कामामुळे बैठकीतून लवकर निघून गेले होते आणि त्यांच्यात कोणतेही राजकीय मतभेद नाहीत. पक्षाच्या शिस्तीनुसारच सर्व कामकाज सुरू आहे. काही कार्यकर्त्यांची स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची मागणी असली तरी, हा निर्णय आपल्या हातात नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात महायुतीबाबत ठिकठिकाणी चर्चा सुरू असून, पुण्यात इतर पर्याय काय असतील, याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. शिवसेना आपले संघटन मजबूत असलेल्या आणि प्रबळ उमेदवार असलेल्या जागांवर निवडणूक लढवणार आहे. पक्षाने स्वतःचा सर्व्हे देखील केला आहे. युती चर्चेला वेळ लागला म्हणजे अन्याय झाला असे होत नाही, असेही त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांनी पक्षाचे नियम आणि शिस्त पाळावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

