पुणे -शहरातील कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय फुरसुंगी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून देहविक्रय करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर, पवन सोनपारखे आणि बिंदा नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तेहसीन बेग यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील क्रिस्टल लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली आणि लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी बाणेर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी लॉज व्यवस्थापकाला अटक करून तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. बाणेर, बालेवाडी आणि कोरेगाव पार्क या भागांमध्ये असे प्रकार अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.
कोरेगाव पार्क भागातील एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायही पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी सिल्व्हर सोल स्पा नावाच्या मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक फैजल अजिहूर रेहमान अहमद उर्फ समीर (वय ३८, रा. कोणार्क व्हयू सोसायटी, केशवनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वणवे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. सहायक पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोके तपास करत आहेत.

