भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवारांशी युती करण्यावरून निष्ठावंत प्रशांत जगतापांनी दिला होता राजीनामा
पुणे- महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांच्या आग्रहानुसार युतीची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, काल झालेल्या एका बैठकीत जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्यानंतर अजित पवारांसोबतची बैठक फिस्कटली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या (मविआ) साथीनेच लढण्याचा निर्णय घेत थेट काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेशी जुळवून घेतले आहे.
काल अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात जागावाटपासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांच्या गटाकडून शरद पवारांच्या पक्षाला अत्यंत जाचक अटी घालण्यात आल्या. अजितदादांच्या गटाने शरद पवार गटाला पुण्यात केवळ ३५ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला. एवढचं नाही या ३५ जागांवरही उमेदवारांनी अजित पवारांच्या ‘घड्याळ’ या चिन्हावरच निवडणूक लढवावी, अशी अट घालण्यात आली. स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व पणाला लावणारा हा प्रस्ताव शरद पवार गटाला पूर्णपणे अमान्य होता. त्यामुळे ही युती होणे अशक्य असल्याचे स्पष्ट होताच, शरद पवार गटाच्या नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

