पुणे- सिंहगड पायथ्याजवळील खानापूर येथे शुक्रवारी (ता. २६) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या पाच जणांनी तोंडाला रुमाल बांधून आणि कोयत्याचा धाक दाखवत वैष्णवी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानावर दरोडा टाकला.यात सुमारे एक कोटी रुपये किंमतीचे अंदाजे ८० तोळे सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार झाले. हवेली पोलिसांसह पुणे ग्रामीण पोलिस दल आरोपींचा कसून शोध घेत आहे.या प्रकरणी दुकानमालक सिताराम बाबर यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोन्याच्या दुकानातील तसेच रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून स्थानिक गुन्हे शाखा, हवेली व वेल्हे पोलीस ठाण्यांतर्फे दहा-बारा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती हवेली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांनी दिली.
खानापूर येथील पानशेत रस्त्यावर असलेल्या वैष्णवी ज्वेलर्स दुकानात घटना घडली तेव्हा मालक सिताराम बाबर, त्यांचा आजारी मुलगा आणि दोन महिला कामगार असे चौघेजण उपस्थित होते. दुकानात त्यावेळी ग्राहक नव्हते. दरोडेखोरांनी यापूर्वी दुकान व परिसराची पाहणी केली होती. साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक दुकानात शिरून त्यांनी धारदार कोयते बाहेर काढले आणि ठार मारण्याची धमकी देत अवघ्या एक-दोन मिनिटांत लूट केली. त्यानंतर आरोपी पानशेतच्या दिशेने मोटरसायकलवरून पसार झाले. आरडाओरड सुरू होईपर्यंत दरोडेखोर गायब झाले होते. संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे.
या घटनेत शोकेसमधील सुमारे ७५ ते ८० तोळे सोन्याचे दागिने, अलंकार आणि मौल्यवान ऐवज लुटला असून त्याची किंमत सध्याच्या बाजार भावानुसार जवळपास एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांसह पुणे ग्रामीण पोलिसांनी पानशेत, सिंहगड परिसर आणि डोंगर-दऱ्यांत शोधमोहीम सुरू केली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. रात्री १० पर्यंत आरोपींचा ठावठिकाणा लागला नव्हता.
“दुकानातील ७० ते ८० तोळे सोन्याचे दागिने लुटून नेण्यात आले आहेत. आरोपींनी दरोड्यापूर्वी परिसरावर पाळत ठेवून नियोजनबद्धरीत्या गुन्हा केला आहे. त्या वेळी दुकानात गिऱ्हाईक नसणे आणि रस्त्यावर तुलनेने कमी वर्दळ असणे याचा फायदा त्यांनी घेतला. भरदुपारी झालेल्या या सशस्त्र दरोड्यामुळे खानापूर, सिंहगड, पानशेत आणि खडकवासला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,” अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

