आज किंवा उद्या युतीची घोषणा होईल
छत्रपती संभाजीनगर-महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, अजित पवार सत्तेत आहेत, ते कुठे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट म्हणाले, अजित दादा सत्तेमध्ये आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे अजित दादा कोणीकडे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात. शरद पवार यांना एनडीएमध्ये घ्यायचे की नाही, हा निर्णय भाजपचे वरिष्ठ ठरवतील. राष्ट्रवादीची भाजपसोबत आघाडी आहे आणि आमची युती भाजपसोबत आहे. म्हणून भाजपची शरद पवार यांच्याबद्दल काय भूमिका असेल ती भाजपने ठरवावी. शरद पवार हे जास्त काही विरोधी पक्षात राहू शकत नाहीत. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास बघितला तर त्यांनी अनेक वेळा असे उलटे-सुलटे प्रयत्न केले आहेत, असे शिरसाट म्हणाले.
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, शरद पवार यांना एनडीएमध्ये घ्यायचे की नाही हे एनडीएच्या नेत्यांनी ठरवायचे आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत, भाजपची आणि आमची नैसर्गिक युती आहे. इतर घटक पक्ष एनडीएमध्ये येत असतील तर त्याला भाजप जबाबदार राहील, आम्ही नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकांच्या संदर्भात बोलताना सणजे शिरसाट म्हणाले, भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी जास्त आहे. कोणता प्रभाग सोडायचा, तसेच कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. इच्छुक हस्त आहेत आणि जागा कमी आहेत, म्हणून कोणती जागा घ्यायची आणि लढवायची ही चर्चा होणे गरजेचे आहे. आज किंवा उद्या युतीची घोषणा होईल. भाजप-शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक युतीमध्ये लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन-चार जागेवर जे आलेले आहे, त्यावर मंत्री अतुल सावे आणि मी चर्चा करणार आहोत आणि योग्य निर्णय घेणार आहोत.
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. कोण कुठे लढणार याची यादी एक-दोन दिवसात फायनल होईल. अतुल सावे आणि मी फायनल चर्चा करून, ती यादी भाजपा आणि शिवसेनेच्या वरिष्ठांना पाठवू आणि नंतर जाहीर केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

