पुणे : धर्म, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेसाठी अल्पवयातच सर्वोच्च बलिदान देणाऱ्या साहिबजाद्यांच्या अतुलनीय शौर्य व त्यागाच्या स्मरणार्थ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात गुरुवारी (दि. २६) ‘वीर बाल दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी गुरू गोविंदसिंगजी यांचे वीर सुपुत्र साहिबजादे जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानास विनम्र अभिवादन करण्यात आले.
साहिबजाद्यांचे जीवन धैर्य, सत्यनिष्ठा, त्याग आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श घालून देणारे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. युवक पिढीने या आदर्शांचा अंगीकार करून समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमास विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, प्रशासन विभागाच्या सहआयुक्त रूपाली आवले-डंबे, मुख्य वित्त अधिकारी सविता नलावडे, अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त किरणकुमार काकडे, नियोजन विभागाच्या सहमहानियोजनकार श्वेता पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

