पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी बंडू आंदेकरसह त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर उद्या शनिवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त येथे समजते आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचंड मोठ्या हालचाली सुरु आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात उमेदवार ठरविणे, युती आणि आघाडीबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत विचार विनिमय करणे, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे हे सर्व कामे सुरु आहेत. इथे प्रत्येक पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापली ताकद लावताना दिसत आहेत. तसेच प्रत्येक पक्षाकडून मोठी रणनीती आखली जात आहे. अर्ज भरण्याची शवेटची तारीख आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी उमेदवार निश्चित करणं आणि युती-आघाडीच्या टप्प्यांची चर्चा करणं ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर येताना दिसत आहे. या घडामोडी सुरु असतानाच पुणे गँगवॉर प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियातील सदस्यांना उमेदवारी अर्जा दाखल करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.
नातू आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी कुख्यात बंडू आंदेकरसह त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यानुसार, तिघे आरोपी आज (शनिवारी) पोलीस बंदोबस्तात आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी कोणतीही मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषणे करू नये, अशी ताकीदही न्यायालयाने आरोपींना दिली आहे.

