मुंबई- मनसेला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजनांनी ठाकरे बंधूंवर विशेषतः राज ठाकरेंवर कडाडून हल्ला चढवला आहे. एकनाथ शिंदे रात्री कितीही वाजता भेटतात. याऊलट बाकी लोक औषध घेऊन लवकर झोपतात, असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी हिंदुत्त्व सोडले आहे. त्यामुळे एकदा जागावाटप जाहीर होऊ द्या, त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणालेत.
प्रकाश महाजन यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी सध्या अंधारात एकत्र जाण्यापेक्षा दोघे एकत्र जाऊ अशी भूमिका घेतली आहे. पण त्यांच्या नशिबातील अंधार चुकणार नाही. 20 वर्षांचा दुरावा 10 मिनिटांत संपतो का? दोन्ही भावांनी हिंदुत्व सोडले आहे. एकदा जागावाटप होऊ द्या. त्यांच्याकडे कुणीच उरणार नाही. त्यांचा मुंबई, ठाणे व नाशिक या तीनच महापालिकांत इंटरेस्ट आहे. इतर ठिकाणी ठाकरे कुठेही लक्ष देत नाहीत.
प्रकाश महाजन यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचेही तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे रात्री कितीही वाजता भेटणारे नेते आहेत. बाकी लोक औषध घेऊन लवकर झोपतात. कुणी कंबरेवर हात ठेवून कुणाचा वारस होऊ शकत नाही. शिंदेंनी स्वतःच्या कामातून स्वतःचा वारसा सिद्ध केला आहे. यापुढे कुणी शिंदेंवर टीका केली तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. आम्हीही मराठी आहोत. मग हे ठाकरे बंधू कोणत्या मराठी माणसांविषयी बोलतात.
प्रकाश महाजन म्हणाले, मी आज शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मी यापूर्वी शिवसेनेचा उपनेता होतो. एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत. पण ते स्वतःला शिवसेनेचा नेता समजतात. हा त्यांचा मोठेपणा मला खूप भावला. मी गुरुवारी रात्री त्यांना भेटलो. ते फार उत्साहाने मला भेटले. एक मराठी माणूस रात्री 12 वा. एका मराठी माणसाला भेटतो हे पाहून फार बरे वाटले. माझा पक्षप्रवेश मंगेश चिवटे यांच्यामुळे झाला. ते आरोग्य दूत असले तरी माझ्यासाठी राजदूत झाले. माझी हिंदुत्वावर काम करण्याची इच्छा होती. शिंदे हिंदुत्वाविषयी फार जागरूक आहेत. ते खरोखरच हिंदुत्ववादी आहेत.
त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात खूप चांगले काम केले. महाराष्ट्र जातीयवादाने पेटला असताना त्यांनी अत्यंत कुशलपणे परिस्थिती हाताळली. एखादे गाव अतिवृष्टीमध्ये वाहून जाते आणि रात्री दीड वाजता मुख्यमंत्री तिथे पोहचतो. या महाराष्ट्रात असे काही मुख्यमंत्री झालेत की, त्यांनी घर सोडले नाही. जे परीक्षेला बसले नाही ते पहिले आलेत.

