पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकल्यावर आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश झाला . रमेश बागवे , मोहन जोशी यावेळी उपस्थित होते . या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या हालचालींमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली होती. गुप्त बैठका, नेत्यांच्या गाठीभेटी आणि पडद्यामागील चर्चा सुरू असतानाच या अजित पवार आणि शरद पवार गटाच्या संभाव्य युतीला उघड विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला.
राजीनामा जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रशांत जगताप यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट चित्र समोर आलं. आज दुपारी पुण्यातील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात त्यांचा अधिकृत प्रवेश पार पडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील धोरणात्मक भूमिकांबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश होण्यापूर्वी प्रशांत जगताप यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन करून थेट संवाद साधल्याची माहिती समोर आली होती. गुरुवारी रात्री सुमारे नऊ मिनिटे दोघांमध्ये फोनवर चर्चा झाली. या संभाषणात उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना पक्षात येण्याचं आमंत्रण देत योग्य सन्मान दिला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तसेच शिवसेना ठाकरे गट भाजपसोबत जाणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केल्याचं समजतं. याशिवाय ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत जगताप यांच्याशी संपर्क साधला होता.
या सर्व घडामोडींवर प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांनी आपल्यासारख्या एका कार्यकर्त्याशी संवाद साधल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते. भाजपविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या आणि संघर्ष करण्याची तयारी असलेल्या नेत्याने आपली भावना समजून घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आपण भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. आपण काँग्रेस विचारधारेचा कार्यकर्ता असल्यामुळे काँग्रेस हाच आपल्यासाठी योग्य पर्याय असल्याचं त्यांनी याआधीच स्पष्ट संकेत दिले होते.
आपल्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना प्रशांत जगताप यांनी आपली लढाई ही कोणत्याही एका व्यक्तीविरोधात नसून, संविधान आणि पुरोगामी विचारधारेसाठी असल्याचं स्पष्ट केलं. राज्यातील भाजप सरकार आणि महायुतीला प्रभावीपणे आव्हान देऊ शकणाऱ्या पक्षासोबत उभं राहणं, हाच आपल्या निर्णयामागचा निकष असल्याचं त्यांनी सांगितलं. अखेर आज हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी आपल्या निर्णयाला अंतिम स्वरूप दिलं. या घडामोडींमुळे पुण्यातील राजकारण तापलं असून, महापालिका निवडणुकीआधीच पक्षांतराच्या राजकारणाला वेग आल्याचं स्पष्ट झालं आहे.

