काँग्रेसमध्येही अस्वस्थता हि भाजपाने पेरलेली बातमी
भाजपाला साथ देणाऱ्यांना हाथ देणार नाही ठाम भूमिका ठेवल्याने पुण्यातील भाजपचे कट्टर विरोधी नेता म्हणून निर्माण झाली राज्यभर ओळख
पवार काका पुतण्याचे राजकीय एकत्रीकरण मतदारांशी प्रतारणा करणारे
पुणे- पुणे महापालिका निवडणूक आता राज्यात एकदा केंद्रस्थानी आली आहे. पुण्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत असून, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये संभाव्य युतीच्या चर्चांनी वातावरण तापले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच या निर्णयाला तीव्र विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट राजीनाम्याचं अस्त्र उपसले आहे. पवार काका पुतण्याचे राजकीय एकत्रीकरण मतदारांशी प्रतारणा करणारे मानले जाते यामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशांत जगताप यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि आतापर्यंत मिळालेल्या संधींबद्दल आभार मानले. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांमुळे आपली वैचारिक भूमिका डावलली जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेदरम्यान प्रशांत जगताप भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी वेदनादायी असल्याचं त्यांच्या शब्दांतून स्पष्ट दिसत होतं.
राजीनाम्यानंतर लगेचच प्रशांत जगताप काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून जगतापांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही प्रशांत जगताप यांना संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र दोन दिवसांपूर्वीच आपण काँग्रेसच्या विचारधारेचा असल्याचं स्पष्ट करत, शिवसेनेत जाण्याची शक्यता जगताप यांनी नाकारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काँग्रेस प्रवेशावरच त्यांची शिक्कामोर्तब झाला.
प्रशांत जगताप यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास ते पुण्यातील एक अनुभवी आणि वजनदार नेते मानले जातात. त्यांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती. पुणे महानगरपालिकेत त्यांनी दीर्घकाळ नगरसेवक म्हणून काम केलं असून, वानवडी प्रभागातून ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत. 2007, 2012 आणि 2017 या तिन्ही महापालिका निवडणुकांत त्यांनी विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली होती. स्थानिक पातळीवरील संघटन बांधणी आणि जनसंपर्कात ते कुशल मानले जातात.
2016-17 या कालावधीत प्रशांत जगताप यांनी पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील विविध नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत प्रशासकीय अनुभव मिळवला. त्यानंतर 2021 मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राहण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते आणि पुण्यातील शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. जरी त्यांना विजय मिळवता आला नसला तरी, हडपसर आणि आसपासच्या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याचं स्पष्ट झालं होतं. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला या निर्णयामुळे मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत.
प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील पुण्यातील एकमेव ताकदवान नेता असल्याची चर्चा होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाची पुण्यातील ताकद कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर, काँग्रेसमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला एक अनुभवी नेता मिळणार असून, नगरसेवकांची संख्या वाढण्याची संधी काँग्रेससमोर निर्माण होणार आहे.
दरम्यान, प्रशांत जगताप यांना राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही प्रशांत जगताप यांना फोन केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र जगताप यांनी शिंदेंशी संवाद टाळल्याचं समोर आलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी त्यांना आपल्याकडे घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काँग्रेसच्या विचारधारेशी निष्ठा असल्याने ते काँग्रेसमध्येच प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.
पक्षप्रवेशाबाबत माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप यांनी उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधून भावना समजून घेतल्या. भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला आक्रमक नेता म्हणून उद्धव ठाकरे यांचा त्यांनी उल्लेख केला. मात्र, आपण भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. संविधान, पुरोगामी विचारसरणी आणि भाजपविरोधी लढा हीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी नमूद करत, पुण्याच्या भल्यासाठी योग्य तो राजकीय निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. या सर्व घडामोडींमुळे पुण्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची नांदी ठरली असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

