मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा ठाम दावा करत फडणवीसांनी भावनिक राजकारणावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई असल्याचं स्पष्ट केलं आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची लढत सर्वाधिक चर्चेत आली असून, राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेतील सत्तासमीकरणे, मराठी अस्मिता आणि नेतृत्वाचा मुद्दा यामुळे निवडणूक प्रचाराला वेगळीच धार प्राप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा केली. या पत्रकार परिषदेत दोघांनीही महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत निवडणूक रणनितीची दिशा स्पष्ट केली.
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यामागील भावना स्पष्ट करताना सांगितले की, कुठलाही वाद, भांडण किंवा राजकीय मतभेद यापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे. हे विधान केवळ एखाद्या मुलाखतीपुरते मर्यादित नसून, ती त्यांच्या मनातील खोल भावना असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. मुंबईचा कारभार मराठी माणसाच्या हातात असावा, ही भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून, विशेषतः महापौरपदाच्या चर्चेला जोर आला आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी ठेवण्याचे संकेत या युतीतून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून येणाऱ्या प्रतिक्रियांकडेही सर्वांचे लक्ष लागले होते.
राज ठाकरे यांच्या मुंबईचा महापौर मराठीच होणार, या विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत कोणाला महापौर बनवायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आणणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मुंबई ही कोणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा विषय नसून, मुंबईकरांसाठी चाललेली लढाई आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढायचं आहे, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका केली. तसेच जिहादी मानसिकतेला ठेचण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नसून, विचारांची लढाई असल्याचा दावा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपाच्या इतिहासाचाही उल्लेख करत सांगितले की, मुंबईतच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जन्म झाला. त्यामुळे अटलजींचं भव्य आणि योग्य स्मारक मुंबईत उभारलं जावं, ही आमची भूमिका आहे. कोणाला महापौर बनवायचं यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मुंबईकरांच्या विकासासाठी कोण काम करू शकतो, याचा विचार व्हायला हवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भावनिक मुद्द्यांपेक्षा कामगिरी महत्त्वाची ठरेल, असा दावा करत त्यांनी महायुतीच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त केला. मुंबईत सत्तेसाठी नव्हे, तर मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही लढत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
विरोधकांनी मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं पाप केले
विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही पक्षाला निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावं लागतं, तेच आज काही पक्ष करत आहेत. निवडणुकीसाठी दोन-चार पक्ष किंवा नेते सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचं काम पाहूनच मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी आरोप केला की, विरोधकांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला असून, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं पाप केलं आहे. त्यामुळे मराठी जनता आता त्यांच्या सोबत उभी राहणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला असून, निवडणुका जवळ आल्या की भावनिक भाषणं केली जातात. मात्र आता जनता अशा भावनिक घोषणांना भुलणारी नसून, कामाच्या आधारे निर्णय घेणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर विचारधारांचा संघर्ष ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

