मुंबई-“पुण्यात जर दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असतील, तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल,” असे मोठे विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. यामुळे मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेसचे बिनसल्याचे दिसून येत आहे. भाजपबरोबर सत्तेत राहणाऱ्या राष्ट्रवादीशी पवारसाहेबांच्या तुतारीने युती केल्यास महाविकास आघाडीला काय अर्थ आहे एका हाताने भाजपला साथ द्यायची आणि दुसऱ्याहाताने विरोध दर्शवायचा हि कसली राजनीती ? असा सूर आता कॉंग्रेस मधून उमटत आहे.
पुणे महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये बैठकी सुरू आहेत. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचे आम्ही ऐकले आहे. या संदर्भात आमचे शरद पवार यांच्याशी बोलणे सुरू होते. मात्र, जर दोन्ही राष्ट्रवादी खरोखरच एकत्र येणार असतील, तर काँग्रेसकडे कोणताही पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू.”
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर काँग्रेसने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. मुंबईत काँग्रेसला शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासोबत निवडणूक लढवायची होती, मात्र मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध होता, असे विजय वडेट्टीवार यांनी आधीच सांगितले होते. आता पुण्यातही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य युतीमुळे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे मुंबईनंतर पुण्यातही महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकीकडे मविआमध्ये कुरबुरी सुरू असताना, सत्ताधारी महायुतीतही सर्व काही आलबेल नाही. पुणे महापालिकेसाठी भाजपने आपली ११५ उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. मात्र, मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने ३५ जागांची मागणी लावून धरली आहे. भाजप केवळ १८ जागा देण्याच्या मानसिकतेत आहे. तर शिवसेनेला किमान २० ते २५ जागा मिळाल्या तरीही युतीचा मार्ग मोकळा होईल, असे समजते. मात्र, जागावाटपाचा हा आकडा न जुळल्यास महायुतीमध्येही ‘बिघाडी’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे महानगरपालिकेत सध्या प्रत्येक पक्ष सावध पवित्रा घेत आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कोण कोणाशी हातमिळवणी करणार आणि कोण स्वबळावर शड्डू ठोकणार, याचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, विजय वडेट्टीवार यांच्या विधानामुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

