पुणे : भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि ‘सुशासन दिन’ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात गुरुवारी (दि. २५) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना व कार्याला विनम्र अभिवादन केले.
देशाला प्रगतीच्या शिखरावर नेणारे मुत्सद्दी नेते आणि प्रतिभासंपन्न कवी अशी स्व. वाजपेयी यांची ओळख होती. पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासनाचा त्यांनी दिलेला संदेश आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये अटलजींच्या जन्मदिनी, म्हणजेच २५ डिसेंबर रोजी दरवर्षी ‘सुशासन दिन’ साजरा करण्याची घोषणा केली होती.
‘पीएमआरडीए’ मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात लेखा व वित्त विभागाच्या लेखाधिकारी माधुरी बांदल यांनी अटलजींच्या प्रतिमेला मालार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्व आणि जीवनकार्यावर विचार मांडत, त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची जोपासना करणे हीच अटलजींना खरी श्रद्धांजली ठरेल, असा सूर त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी अनधिकृत बांधकाम निर्मूलन शाखेचे उपाधीक्षक सत्येन शहारे, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे, वित्त विभागातील कर्मचारी गोविंदा कांदाळकर, हुसेन नदाफ यांच्यासह ‘पीएमआरडीए’तील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

