मुंबई-आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची औपचारिक घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मुंबईतील मराठी मतदारांचा मोठा वर्ग एकवटण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही युती भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः मुंबईत शिवसेना-मनसेची एकत्रित ताकद भाजप आणि शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते, हे लक्षात घेऊन भाजपने तातडीने आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीचा धोका ओळखत भाजपने आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील जागावाटपाबाबत लवचिक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. याआधी झालेल्या पहिल्या जागावाटप बैठकीत भाजपने 227 पैकी केवळ 52 वॉर्ड शिंदे गटासाठी सोडण्याची तयारी दाखवली होती. या प्रस्तावामुळे शिवसेना प्रचंड नाराज झाली होती. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपने आता शिंदे गटासाठी 70 वॉर्ड सोडण्याचा नवा प्रस्ताव मांडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तरीही शिवसेनेकडून 100 जागांची मागणी कायम असून, भाजपने ती मागणी फेटाळल्याने सध्या दोन्ही पक्षांमध्ये 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे.
शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली ही जागावाटपाची रस्सीखेच अद्याप सुटलेली नाही. भाजप 70 जागांवर ठाम असल्याचे सांगितले जात असताना, शिवसेना मात्र अधिक जागांवर ठाम आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद अजूनही कायम आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनेही आपली तयारी वेगाने सुरू केली असून, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपच्या रणनीतीत मोठे बदल होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मुंबई पालिकेसाठी उमेदवारांची निवड, निवडणूक रणनीती आणि संभाव्य समीकरणांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. ही बैठक उशिरापर्यंत सुरू होती. मुंबई भाजपच्या कोअर कमिटीकडून काही उमेदवारांची अंतिम यादी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आली असून, आज पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

