पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) विभागाने कडक पावले उचलली आहेत. वारेमाप खर्च, रोख रकमेचा तसेच मौल्यवान वस्तूंचा गैरवापर रोखण्यासाठी पुणे विभागात सर्व दिवस चोवीस तास कार्यरत असणारा विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक राहावी, तसेच आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. महापालिका निवडणुका २०२५–२६ दरम्यान पैशांच्या गैरवापरावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्धार प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे विभागाअंतर्गत ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, अहिल्यानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी तसेच सांगली-मिरज-कुपवाड या महापालिकांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी आचारसंहिता लागू असेपर्यंत निवडणूक देखरेख यंत्रणा कार्यरत राहणार आहे.निवडणूक प्रचारादरम्यान रोख रकमेचा, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंचा गैरवापर होत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी, असे आवाहन प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप, एसएमएस तसेच ई-मेलच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संपर्कासाठी तपशील :
टोल फ्री क्रमांक – १८००-२३३-०७०१
व्हॉट्सॲप क्रमांक – ९९२२३८०८०६
ई-मेल – pune.pdit.inv@incometax.gov.in
पत्ता :
नियंत्रण कक्ष, कक्ष क्र. ८२९, ८ वा मजला,
आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क,
गुलटेकडी, पुणे – ४११०३७

