श्री शिवाजी कुल, पुणे संस्थेतर्फे आयोजन ; स्व-रूपवर्धिनी च्या मुलांचे सादरीकरण
पुणे : बदलते हवामान, धकाधकीची जीवनशैली आणि बिघडलेली आहारशैली अशा आजच्या वातावरणात सुदृढ शरीर संपन्नतेचा संदेश मल्लखांब प्रात्यक्षिकांतून चिमुकल्यांना देण्यात आला. विविध प्रकारची आसने व कसरती मल्लखांबावर करीत स्व-रूपवर्धिनी च्या मुलांनी चित्तथरारक सादरीकरण केले.
निमित्त होते, सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे स्काऊट गाईड खुल्या पथकातर्फे पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर आयोजित मल्लखांब प्रात्यक्षिके आणि शेकोटी कार्यक्रमाचे. यावेळी संस्थेतील आजी व माजी कुलवीर, स्काऊट, गाईड, कब, बुलबुल, बनी या विभागातील मुले व मुली उपस्थित होते.
स्काऊट शिक्षणात निसर्ग निवास व रात्र निवास याला महत्त्व आहे. निसर्ग निवासात रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवून अग्नीची प्रार्थना म्हणून स्काऊट व गाईड विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम म्हणजेच समूहगीत, नाट्यछटा, नाटक सादर करतात. शेकोटीच्या वेळी आरोळ्या हा देखील एक उत्साहवर्धक भाग असतो. त्यामुळे यंदा देखील मुलांनी समूह गायन सादर केले. विविध आरोळ्या देखील मुलांना शिकविण्यात आल्या. स्व-रूपवर्धिनी च्या मुलांनी मल्लखांबावर केलेले सादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

