ढोल ताशांच्या गजरात प्रभाग क्रमांक ३४ मध्ये आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे:उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात सर्वप्रथम आघाडीवर असलेल्या आम आदमी पार्टीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात देखील पहिला क्रमांक मिळविला आहे. ना रस्सीखेच, तानातानी , राजकीय साद पडसाद ,घोड्या -कुरघोड्या अशा पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीची राजकीय वाटचाल यानिमित्ताने पुण्यात सुरु असल्याचे द्सिते आहे. आज ढोल ताशांच्या गजरात, शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पुणे महापालिकेच्या नऱ्हे- वडगाव- धायरी प्रभाग क्रमांक ३४ अ , मध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जरवाल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, महासचिव सतीश यादव अक्षय शिंदे ,संदीप बेनकर ,अक्षय देडगे, रोहन देडगे, बाळकृष्ण आलमले, राहुल बेनकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रकाश जरवाल म्हणाले की, सर्व सामान्य पुणेकरांच्या न्याय हक्कासाठी आम आदमी पक्षाने चळवळ उभी केली आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील म्हणाले , आम आदमी पक्ष हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाने सातत्याने लढा दिला आहे.
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, सत्ताधारी महायुतीने जनतेचा विश्वासघात केला आहे. महायुतीचे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत. नगरपालिकां निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांनी कपटनितीने सत्ता मिळविली मात्र आता महापालिका निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव होणार आहे. प्रभाग क्रमांक ३४ सह पुण्यात आम आदमी पक्षाला निर्विवाद विजय मिळणार आहे.


