पुणे- ‘ महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य माणसाचा अपेक्षाभंग केला आहे.आज कोण नेता कुणासोबत आहे हे कळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली आहे. निवडून आल्यावर आत्ताचे नगरसेवक कोट्यधीश बनले आहेत. विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत पोहचवण्यासाठी शाळा, दवाखाने, वाहतूक,रोजगार याचे सक्षमीकरण करणे हे आप चे धोरण असेल. पंजाब, दिल्ली येथे जे बदल करून दाखवले तेच आप ची विकासाचे मॉडेल आहे.’ पुण्यात पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे प्रभारी आणि दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल बोलत होते.
आम आदमी पार्टी ही निवडणूक स्वबळावर लढणार असून सर्व जागा लढवण्याचा प्रयत्न असेल. प्रामाणिक इमानदार कार्यकर्ते आमच्याकडे असल्याने आम्ही अनेक नगरपालीकांमध्ये उमेदवार यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. आम आदमी पार्टी ने स्टार प्रचारक यादी जाहीर केली असून राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री अतिशी, पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान, राखी बिडलान प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत अशी माहिती प्रकाश जरवाल यांनी दिली.
नगरपरिषद निवडणुकीत नेवासा येथे आप उमेदवार शालिनीताई सुखधान निवडून आल्या असून महाराष्ट्रात खाते उघडले आहे असे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी सांगितले.
या वेळी आप राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत तसेच शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे व पदाधिकारी उपस्थित होते.

