मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. “प्रशांत जगताप यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही, त्यामुळे मला त्याबद्दल अधिकृत माहिती नाही,” असे सांगत सुळे यांनी या राजीनामा नाट्यावर सस्पेन्स कायम ठेवला आहे. तसेच, २६ डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार असल्याच्या अजित पवारांच्या दाव्यावरही त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
प्रशांत जगताप यांच्या नाराजीबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राजीनामा द्यायचा असेल तर तो प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे जाणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप तरी तसे काही घडल्याचे माझ्या कानावर नाही. कालच मी स्वतः, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी प्रशांत जगताप यांच्याशी मुंबईत दोन तास सविस्तर चर्चा केली. महापालिका निवडणुकीत पक्षाचे धोरण काय असावे आणि समोर कोणते पर्याय आहेत, यावर आमचे सकारात्मक बोलणे झाले आहे.” आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
मुंबईतील निवडणुकीबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या ऐक्यावर भर दिला. “आमची मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत चर्चा सुरू आहे. आजही आम्ही त्या चर्चेसाठी पुन्हा बसणार आहोत. दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. मताचे विभाजन होऊ नये, यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. आम्ही जे काही करतोय, ते विकासासाठी करतोय,” असेही त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना २६ डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होणार असल्याचे विधान केले आहे. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवार हे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी जर काही विधान केले असेल, तर ते नक्कीच विचार करून आणि जबाबदारीने केले असेल. मात्र, अद्याप माझ्याकडे किंवा पक्षाकडे असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही.” या विधानातून सुळे यांनी युतीची शक्यता पूर्णपणे नाकारली नाही, मात्र चेंडू अजित पवारांच्या कोर्टात ढकलला आहे.
महापालिका निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कार्यकर्त्यांचे हित आणि त्यांची मते महत्त्वाची ठरणार आहेत. “आघाड्यांबाबत अनेक स्तरावर चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत काही ठोस हातात पडत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. जागावाटप सध्या अंतिम टप्प्यात असून कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवूनच आम्ही पुढील पाऊल उचलू,” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

