रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने प्रसिद्ध कवयित्री, गझलकार प्राजक्ता पटवर्धन यांचा गौरव केला जाणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ कवयित्री, डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते होणार असून भाऊसाहेब पाटणकर यांचे नातजावई, अभिनेते किरण यज्ञोपवीत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-रंगत प्रतिष्ठाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गझल मुशायरा आयोजित करण्यात आला असून यात प्रमोद खराडे, नचिकेत जोशी, योगेश काळे, स्वाती यादव, सुनिती लिमये, स्वाती दाढे, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, चैतन्य दीक्षित, चैतन्य कुलकर्णी, वासंती वैद्य यांचा समावेश आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

