गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : आयुष्यातील कधीच न बदलणाऱ्या तीन गोष्टी सत्य आहेत, त्या म्हणजे आयुष्यातील प्रश्न, मृत्यू आणि घडणारे बदल. या तीनही गोष्टींना समजून घेत आयुष्य कायम आनंदाने जगा, अडचणींवर मात करत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या, आयुष्य आनंदाने न जगल्यास ते व्यर्थ ठरते, अशा भावना प्रसिद्ध लेखिका गजाला शेख यांनी व्यक्त केल्या.
गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ द पूना क्लब, कॅम्प येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी आयोजित संवादात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गजाला शेख यांच्याशी अंशुमन आनंद यांनी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उदयन पाठक, ज्योतिषतज्ज्ञ संदीप अवचट, पार्थो सारथीदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
गजाला शेख पुढे म्हणाल्या, आयुष्यात लहानपणापासूनच अनेक बरे-वाईट अनुभव आहे. तेंव्हा पासूनच आयुष्य शिकायला सुरुवात केली. माझ्या आयुष्याच्या पुस्तकाची सुरुवात तेंव्हाच झाली. चांगल्या-वाईट प्रसंगांमुळे आयुष्याचा आलेख खालीवर होत असतो. अडचणींच्या काळात न डगमगता तोंड दिल्यास आयुष्य सुखावह होते.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, गजालाच्या पुस्तकातून तिने कठीण प्रसंगांना तोंड देत सावरलेले आयुष्य मला समजले. तिला कोणाचाही पाठींबा अथवा सहानुभूतीची अपेक्षा नाही. प्रत्येक प्रसंगात तिच्या आयुष्याची लढाई तिनेच लढली आहे आणि आजही लढत आहे. या पुस्तुकाद्वारे आयुष्य जगत असताना अडचणींवर मात करत स्वत:ला कसे सांभाळायचे, जपायचे हे समजते. स्त्रीची ताकद काय असते हे तिच्या कथेतून वाचकांसमोर येईल. यातूनच समजातील पुरुषांनी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.
संदीप अवचट म्हणाले, गजाला यांचा प्रवाह हा केवळ पुस्तकासाठी नाही. यातून त्यांनी आपले अंतरंग उलगडले आहेत. त्यांचे व्यक्तिमत्वच खूप विलक्षण आहे. त्यांचे आयुष्य झपाटून टाकणारे आहे. त्या लेखिका नसल्यातरी त्यांनी आपल्या आयुष्याची कहाणी या पुस्तकात प्रामाणिकपणे मांडली आहे. राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याचा प्रवासाप्रमाणे त्यांचे आयुष्य आहे. हे पु्स्तक पथदर्शी असून त्याची मराठी आवृत्ती देखील प्रकाशित व्हावी.
उदयन पाठक म्हणाले, मी आणि गजाला फेसबुकवर जोडले गेलो. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तिचे कौतुक वाटले. तिचे धैर्य कौतुकास्पद आहे. ‘महाराष्ट्राची मलाला’ ही तिच्यावरील कथा वाचल्यानंतर तिच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. तिने रेखाटलेली चित्रेही प्रेरणादायी आहेत. तिने समाजातील अनेक अनाथ मुलांना, संस्थांना मदतीता हात दिला आहे.
पार्थो सारथीदास म्हणाले, जीवन जगताना ठेच लागली की त्यातून धडे मिळतात. समाज काय बोलतो याकडे लक्ष न देता गजाला यांनी आपले काम पुढे सुरू ठेवले. त्या खऱ्या अर्थाने योद्धा आहेत. त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायक आहे. नकारात्मकता न घेता जीवन सकारात्मकतेने जगणे हे त्यांच्या कथेतून प्रकर्षाने जाणवते.
जारा शेख हिने आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या. ‘रायटर्स पॉकेट’तर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

