पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड या तालुक्यांतमधील बहुतांशी क्षेत्र डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प आहेत. पीक पध्दती सिंचनाच्या उपलब्धततेमुळे बहुतांशी भागात ऊसशेती करण्यात येते. ऊसशेतीमुळे वन्यप्राणी बिबट्यास मुबलक भक्ष्य व पाण्याची उपलब्धतता होते, तसेच लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळतो. शेती व्यवसायास जोडधंदा म्हणून करण्यात आलेल्या पशुपालन, कुक्कुटपालन आदी माध्यमातून भक्ष्य उपलब्ध होते.
जिल्ह्यात वन विभागाच्यावतीने मानव व बिबट यामधील संघर्ष कमी करण्याकरिता वन्यप्राणी बचाव व पुर्नभेट, नियमित गस्त, पायाभूत सुविधा व नुकसान भरपाई, सुरक्षितता व काळजी, नियमित प्रशिक्षण, व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्यांची शास्त्रीय गणना करण्याच्यादृष्टीने क्षेत्रीय माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. बिबटप्रवण क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गस्त व टेहाळणी, एआयचा वापर, रात्रगस्त करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर बिबट समस्या निराकरण समिती गठीत करण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे शास्त्रीय व क्षेत्रीय ज्ञान वृद्धींगत करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन, ‘बिबट कृती दल’ बेस कॅम्प स्थापन, “संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र” घोषीत, एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपन, मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांना सौर दिवे व लंबुंचे (टेन्ट) वाटप, एकूण ४०० पिंजरे कार्यान्वित, त्या पिंजऱ्याच्या मदतीतून आता पर्यंत ७५ बिबटे वन विभागाने पकडले आहेत. आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण, नागरिकांना नेक गार्डचे वाटप, अनायडर्स मशीन कार्यान्वित आदी उपाययोजना करण्यात येत आहे.

बिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन ४ बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे. जुन्नर वन विभागात वाढलेला बिबट्याचा प्रादुर्भाव व बिबट-मनुष्य संघर्ष येत्या काळात संपविण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे.
जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरुर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वनपरिक्षेत्राचा समावेश होतो. मानव व बिबट संघर्ष टाळण्याबरोबरच वन्यप्राणी बिबटचे व्यवस्थापन होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत आहे. सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीत १८५ बिबट-बछडे पुनर्मिलन करण्यात आले आहे. गावांमध्ये वनकर्मचाऱ्यांनामार्फत गस्त, नागरिकांचे प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, त्यांच्याकडून गस्त व प्रबोधन करण्यात येत आहे. कलापथक यांचे माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये व शाळांमधून सुमारे ५५ कार्यक्रम करण्यात आले असून व विषय प्राविण्य असणारे श्री. सौमित्रच्या मार्फत वेगवेगळ्या ५० गावांमध्ये विभागातील योजना तसेच बिबट जनजागृतीचे विशेष वर्ग ग्रामपंचायत पद अधिकारी यांचे सह घेण्यात आले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांपासून घ्यावयाच्या काळजी घेण्याबाबतचे माहिती देणारे पोस्टर्स, घडीपत्रके, कार्यशाळा आयोजन करण्यात आले आहे. बचाव पथकाद्वारे वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी पथकातील सदस्य तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पथक यांच्या समन्वयाने वन्यप्राणी रेस्क्यू करण्याची कार्यवाही करण्यात येते. प्राथमिक बचाव पथकातील एकूण ४०० सदस्य कार्यरत आहेत.

अतिसंवेदनशील गावांत २४ X ७ जनजागृती करण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून पिंपरखेड, न्हावरा, भीमा कोरेगाव (ता. शिरुर), आळे व नगदवाडी, जुन्नर (ता. जुन्नर), आणि गावडेवाडी (ता. आंबेगाव) या ठिकाणी ‘बिबट कृती दल’ बेस कॅम्प स्थापन करण्यात आलेले आहेत. यामुळे शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील व आंबेगाव, जुन्नरच्या पूर्व भागातील मानव-बिबट संघर्ष मागील २ वर्षात मोठ्या प्रमाणात नियंत्रित झाला आहे.
विभागीय कार्यालय जुन्नर येथे निंयत्रण कक्ष (टोल फ्री क्रमांक १८००३०३३) स्थापन आले असून २४ X ७ कार्यरत आहे, यामाध्यमातून अतिसंवेदनशील क्षेत्राची माहिती गोळा करुन गस्तीबाबत सूचना देण्यात येते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडील मंजुरीनंतर जुलै २०२४ मध्ये संघर्षक्षेत्रातील १० बिबट्यांचे जामनगर (गुजरात) येथील बचाव केंद्रात स्थलांतर करण्यात आले. ५० बिबटे वनतारा जामनगर गुजरात येथे पाठवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांना ४१० सौर दिवे व ४१० लंबुंचे (टेन्ट) वाटप करण्यात आले आहेत. शिरुर व मंचर वनपरिक्षेत्रातील एकूण ५५ ठिकाणी एआय प्रणाली कार्यान्वित करण्यात आला असून जुत्रर वनविभाग हा राज्यातील पहिला वनविभाग झालेला आहे.
वनविभागातील २३३ अतिसंवेदनशील गावांना “संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र” घोषीत करण्यात आले आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या धर्तीवर शेतातील एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपन हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत १५० घरांना सौर उर्जा कुंपण बसविण्यात आले असून आणखीन ५५० घरांना कुंपणाद्वारे सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. विभागात एकूण ४०० पिंजरे कार्यान्वित आहेत. वनविभागामार्फत ४०० आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना ३ हजार ३०० नेक गार्डचे वाटप, ५० ठिकाणी अनायडर्स मशीन कार्यान्वित आहेत. त्यामुळे नागरिकांहो, प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करा. बिबट्यापासून सावध राहा, खबरदारी घ्यावी. आपण व आपल्या कुटुंबियाची काळजी घ्या.
बिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन ४ बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे,
काय काळजी घ्याल ?:
बिबट्याचा पाठलाग करु नका. त्याला जखमी करु नका. बिबट्या घाबरुन उलटा हल्ला करु शकतो. मुलांनी घोळक्याने फिरावे. अंधारात एकटे फिरताना, परसाकडे जाताना गाणी म्हणा, बोला किंवा बरोबर रेडिओवर गाणी लावून बॅटरी घेऊन फिरावे. रात्री उघड्यावर झोपू नये. विशेषतः मेंढपाळांनी झोपण्यासाठी बंदिस्त जागा करुनच झोपावे. सायंकाळी व रात्री अनावधाने देखील एकट्याने बाहेर पडू नये. सोबतीने किंवा समुहाने वावरावे. मुलांना एकटे सोडू नका. लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. गावाजवळील मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करावी. गुरे रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूने बंदिस्त राहील याची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांना बळी पडू नका.
अचानक बिबट्या समोर दिसल्यास काय कराल ?: अजिबात घाबरू नका. शांत उभे रहा.पळून जाऊ नका. तुम्ही कितीही वेगाने पळालात तरी बिबट्यापेक्षा जास्त वेगाने पळू शकत नाही. पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करणे हा बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव आहे, त्यामुळे तो हल्ला करू शकतो. तुमचे दोन्ही हात वर उचला आणि जोरजोरात ओरडा. असे केल्याने, बिबट्याला तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे प्राणी असल्याचा भास होतो.
जर बिबट्या जवळ असेल, तर ओरडतच हळूहळू मागे सरका. जर तो दूर असेल, तर शांतपणे हात वर करून मागे हटा. झाडात किंवा झाडीत लपू नका. लपण्याचा प्रयत्न केल्यास, बिबट्या तुम्हाला एखादा लहान प्राणी समजून हल्ला करण्याची शक्यता वाढते. खाली वाकू नकाः वाकल्यास तुम्ही लहान दिसता, ज्यामुळे हल्ला होऊ शकतो.
श्री. प्रशांत खाडे, उपवनंरक्षक, जुन्नर वन विभाग: ‘जुन्नर उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने मानव व बिबट यामधील संघर्ष कमी करण्यासोबतच जीवितहानी टाळण्याकरिता उपाययोजना व जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी शौचालयाचा नियमितपणे वापर करावा. सकाळ आणि रात्रीच्या वेळेत शेतात जाण्याचे टाळावे. प्रशासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करुन वनविभागास सहकार्य करावे. बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास कार्यालयाच्या निंयत्रण कक्षाच्या १८००३०३३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

