पुणे- येथील बावधन परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेत धडक कारवाई केली आहे. शनिवारी बावधनमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी एकूण चार महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.
ॲम्ब्रोसिया रिसॉर्टसमोरील सार्वजनिक रस्त्यावर काही महिलांकडून अश्लील वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. तसेच, पेबल्स सोसायटी ०२ समोरील रस्त्यावरही अशाच प्रकारे सार्वजनिक शांततेला बाधा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून छापे टाकले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करून सभ्यतेचा भंग करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.बावधन परिसरातील आयटी पार्क, निवासी सोसायट्या आणि वर्दळीच्या मार्गांजवळ अशा घटना वाढल्याने स्थानिक रहिवाशांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेले अश्लील चाळे रोखण्यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणीही केली जात होती. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
बावधनमध्ये सार्वजनिक रस्त्यावर अश्लील वर्तन; चार महिलांवर गुन्हा दाखल
Date:

