मुंबई- शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही धारेवर धरले. “माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय सहा तासांत निर्णय देते, मात्र 40 आमदारांच्या अपात्रतेवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. कारण सर्वोच्च न्यायालयावर दबाव असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामुळेच शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालासाठी 21 जानेवारी ही निवडणुकीनंतरची तारीख दिलेली आहे, असे मत ही संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता ‘ठाकरे’ बंधूंच्या युतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाचा मोठा तिढा काही प्रमाणात सुटला आहे. विशेषतः शिवडी विधानसभा मतदारसंघातील जागावाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून, उर्वरित मुंबईतील प्रभागांसाठीही वेगाने चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीवर टीका करत, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. महापालिकेतील जागावाटपासाठी ‘मातोश्री’वर झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 या तीन जागांवरून सुरू असलेली ओढाताण आता थांबली आहे. ठरलेल्या सूत्रानुसार, शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटासाठी तर एक प्रभाग मनसेसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या अधिकृत घोषणा करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून एका भव्य मेळाव्याचे किंवा ऐतिहासिक पत्रकार परिषदेचे नियोजन सुरू आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को सेंटर, बांगुर नगर मैदान किंवा वरळीतील डोम या तीन ठिकाणांची चाचपणी केली जात आहे. आज दिवसभरात उर्वरित जागांचे वाटप अंतिम करून युतीचा ‘धडाका’ उडवून देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतर महानगरपालिकांच्या जागावाटपाची चर्चाही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या विजयावर सडकून टीका केली आहे. “नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजपला मिळालेला अभूतपूर्व विजय हा केवळ अभूतपूर्व पैशांच्या उधळपट्टीचा परिणाम आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज यावर सुनावणी पार पडली असून, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अपात्र ठरणार नसून, हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे.तीन दशकांपूर्वीच्या एका सदनिका वाटप प्रकरणातील अनियमिततेचा ठपका ठेवत नाशिक जिल्हा न्यायालयाने 3-4 दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधीची आमदारकी किंवा खासदारकी तत्काळ रद्द केली जाते. या निर्णयामुळे कोकाटे यांचे विधीमंडळ सदस्यत्व धोक्यात आले होते.

